Tuesday, June 16, 2009

शोधयात्रा - अरुण साधू

आपल्यामधल्या 'स्व'चा शोध घेण्याच्या वेडाने झपाटलेल्या श्रीधरची गाथा इथे मांडलीये.ज्याना कोणाला कधी असे अस्तित्त्वाबाद्दलचे प्रश्न पडले असतील त्याना नक्कीच हे पुस्तक पूर्ण वाचून झाल्याशिवाय हातातून ठेवावेसे वाटणार नाही.या पुस्तकातला एक परिच्छेद खाली लिहीलाय. श्रद्धा, अंधश्रद्धा, आस्तिकता काय किंवा धर्माबद्दलच्या कल्पना आणि सत्य याबद्दल बरचसं वास्तव या परिच्छेदामधे जाणवत.

"आश्चर्याची गोष्ट अशी की, कलकत्त्याच्या काली घाटावर काय, की प्रयागच्या संगमावर, किंवा वाराणशीच्या घाटावर काय अथवा देवळांच्या गल्लीबोळांमधे, दर्शनाच्या ओळींमधे किंवा प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीसमोर, आपण फसविले जात आहोत, लुबाडले जात आहोत, हे या भाविकांना समजत असूनही ज्या परमेश्वराच्या अथवा स्थानमहात्म्याच्या श्रद्धेनं अथवा ओढीनं ते येत होते ती त्यांची श्रद्धा अढळ होती. घाण, कुचंबणा, गोंधळ, फसवणूक, लबाडी, उपेक्षा, धर्माचा आणि देवांचा व्यापार, दर्शनासाठी चाललेला काळाबाजार, क्रियाकर्मांसाठी पंड्यांशी आणि पुरोहितांशी होत असलेली घासाघीस आणि सौदेबाजी यापैकी कशामुळेही त्यांची श्रदधा अणूरेणूनही कमी होत नव्हती. उलट, या अडथळ्यांमधे ती तावून अधिकच स्वच्छ आणि उज्ज्वल होत होती. खरोखर, हिंदू धर्म हा मती गुंग करणारा धर्म आहे आणि हिंदू भाविकांची श्रद्धा ही अचाट गोष्ट आहे असे श्रीधरला वाटले. या अचाट श्रद्धेच रुप त्यान पंढरीच्या वारीमधे पाहिल होत. तेच थक्क करणारं श्रद्धेच दर्शन त्यान पुढे बद्रिकेदार आणि गंगोत्रीला घेतलं. त्याचप्रमाणे अमरनाथच्या वाटेवरही. विकलांग आणि तापान फणफणत असलेल्या भाविक वृद्ध स्त्रिया हरिद्वारच्या घाटावर जिद्दीन बर्फासारख्या थंड गंगेमध्ये स्नान करताना आणि बाहेर आल्यावर ताज्या टवटवीत होताना त्यान पाहिल्या आणि तो दिड़मूढ झाला. एरवी घराच्या पायरया चढणसुद्धा ज्यांना जड जाईल, अशा जर्जर वृद्धांना त्यानं हाती काठी घेऊन गंगोत्रीचा किंवा अमरनाथचा बिकट मार्ग पार करताना बघितल आणि तो थक्क झाला. खरोखर श्रद्धा ही स्वतंत्र शक्ती असून ती शक्ती कोणतीही अशक्य वाटणारी जादू करू शकते, अस त्याला वाटू लागलं. आपण अश्रद्ध आहोत, ही किती गैरसोयीची गोष्ट आहे! त्या कोट्यवधी भाग्यवान श्रद्धावानांचा तर त्याला काही काळ हेवाही वाटला. या श्रद्धाळू भाविकांना हिंदू धर्म म्हणजे काय हे नेमकं समजावून सांगता येणार नाही. त्यांनी वेद वाचले नसतील, उपनिषदांचं अध्ययन त्यांनी केल नसेल. शंकराचार्यांनी उपस्थित केलेल्या कूट अध्यात्मिक सिद्धांतांचा त्यांना गंधही नसेल. पण तरी त्यांना मनोमन हिंदू धर्माच आकलन झाल असाव, किंवा त्यांना कदाचित ते आकलन करुन घेण्याची चिंता किंवा उत्सुकताही नसेल. अस्तित्वविषयक, आत्मज्ञानविषयक, वा विश्वाच्या रहस्याविषयीचे प्रश्न यांना सतावीत नसणार. आपल्यासारखं यांना वैचारिक गोंधळानं झपाटलेलें नसणार. फक्त अगम्य, अपार, आणि अगतिक अशी दृढश्रद्धा. खरोखर, श्रद्धाळू जनांच सारं आयुष्यच सोप आणि सुंदर होऊ शकतं. सारया प्रश्नांना आणि समस्यांना नीट आणि सुसंगत उत्तरं मिळू शकतात. सारी आत्मिक अस्वस्थता आणि बेचैनी संपविण्याचा एकमेव सोपा मार्ग म्हणजे श्रद्धाळू बनणं. पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत या कल्पनांवरील श्रद्धेमुळे किती विलक्षण आणि भय़ंकर प्रश्नांची उत्तरं चुटकीसरशी मिळतात! अन्याय, अत्याचार, विषमता, दारिद्र्य, शोषण या सारयांच किती सोप आणि सहज समर्थन सर्वच धर्मांमधे आहे. फक्त बुद्धिप्रामाण्यवादाचा हेका सोडून लीनपणे श्रद्धाळू बनायला हवं. विश्वास ठेवायला शिकायला हवं."