Friday, November 20, 2009

सिंहासन - अरुण साधू


ही कादंबरी आपल्यासमोर राजकीय घडामोडींचे वास्तव चित्रण मांडते. या कादंबरीची प्रथम आवृत्ती आहे १९७७ ची. म्हणजे साधारण राजकारणामधे घडणारया गोष्टी या तेव्हाही काही वेगळ्या नव्ह्त्याच! एखाद्या मंत्र्याने अचानक आपला राजीनामा दिला की राजकीय वर्तुळामधे वादळ उठते. पण या वादळाची चाहूल या वर्तुळाच्या परीघामधे आधीच येऊन पोचलेली असते. राजीनामा देण्याआधीच अफवांचे पेव फुटलेले असतात. अशाच एका प्रसंगाचे वर्णन खाली दिलेल्या परिच्छेदामधे केले आहे.
या प्रसंगाचे आकलन होण्यासाठी काही पात्रांच परिचय आवश्यक आहे.
दिगू टिपणीस - वार्ताहर
विश्वासराव दाभाडे - अर्थमंत्री
'विश्वासराव दाभाड्यांना आपली हालचाल कितीही गुप्त ठेवायची असली, तरी एव्हाना अशा बाबतीत बातम्यांचे आणि कंड्यांचे जे चक्र फिरत असते, त्यान वेगही घेतला होता. टेलिफोन्स बिझी राहू लागले होते. नागपूर, मुंबई, औरंगाबाद, रत्नागिरी, नासिक, अमरावती, पुणे आणि अशा कितीतरी गावांमधे आणि परस्परांत ट्रंककॉल्सची वर्दळ सुरु झाली होती. खासदार, मंत्रिपदाचे इच्छुक आमदार, दबावगटांचे नेते, खुद्द मंत्री, त्यांची घरं, त्यांचे सल्लागार आणि हितचिंतक यांच्यात गडबड उडून गेली होती. विरोधी नेत्यांमधेही कुणकुण सुरु झाली होती.
बातम्यांची वर्तुळावर वर्तुळे निर्माण होऊ लागली होती. पण ती या एका मर्यादित विश्वात. सत्तेशी ज्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे किंवा दूरान्वयानेही जे सत्तास्थानाशी नाते सांगू इच्छितात किंवा सत्तापदांची वेडी स्वप्ने बघत असतात, अशा लोकांच्या, सामान्य जीवनाच्या विशुद्ध प्रवाहापासून दूर फुटलेल्या या वेगळ्या जगात. बाहेरच्या विश्वाला अद्याप याची कल्पना आलेली नसते. आत काहीतरी खळबळ चालू आहे, याची नुसती एक ओझरती जाणीव असतेच, नाही अस नाही. दिगू टिपणीससारखा एखादा बुडबुडा आतला दुर्गंधी वायू बरोबर घेऊन वर फुटत असतो, पण तो अपवादात्मक. अद्याप ही खळबळ आतच आहे आणि ती वर उफाळून येईल, तेव्हा गडबड उडालेली असेल.
सी.एम् जागे झालेले असतात. विधानसभेतील आणि पक्षातील आतल्या गटांची यादी पुन्हा पुन्हा उजळून पहात असतात. गटागटांना हळूच फोनवरुन निरोप जायला सुरुवात होते. हे सर्व सी.एम् नाच करावे लागते असे नव्हे. सी.एम् साठी काम करायला अनेक माणस खुशीन तयार असतात. अर्थमंत्र्यांच्या गटाची तयारी तर आधीच झालेली असते. आता फक्त 'फायर' अशी आज्ञा होण्याची वाट असते.
पक्षाध्यक्ष नेहमीप्रमाणेच गाफील पकडले गेलेले असतात आणि या क्षणापर्यंत आपल्याला हे प्रकरण या थराला आलेले आहे, याची माहिती नसावी, या कल्पनेनं रागाने जळफळत असतात. आपण केलेल्या फोनला सी.एम् च्या आणि अर्थमंत्र्यांच्या बंगल्यामधून चक्क 'साहेब नाहीत' अशी स्टॉक उत्तरं मिळताहेत, हे पाहून अपमानाने तडफडत असतात. पण त्यांचा इलाज नाही. पक्षातलं हे वादंग मिटवायलाच पाहिजे, म्हणून त्यांनी आत अखिल भारतीय पक्षाच्या अध्यक्षाला दिल्लीला कॉल लावलेला असतो. वेळप्रसंग पडल्यास थेट पी.एम् नाही फोन करण्याची ते तयारी ठेवून आहेत.
मंत्रिमंडळाचे इतर सदस्य खुशीत आहेत. त्यांचेही आपापल्या गटांचे मोर्चे बांधणे केव्हाच सुरु झालेले आहे. या लढतीमधे होता होईल तेवढे आपले हात धुऊन घ्यायचे आणि आपली घोडी शक्य तेवढी पुढे सरकवायची त्यांची तयारी आहे. ते याच संधीची आजवर वाट पाहात आले आहेत. आता राजकीय आणीबाणीचे शिंग फुंकले जात आहे. मागे राहून चालणार नाही. विधानसभेतील महत्त्वकांक्षी आणि ताकदवान आमदारही आता रणात उतरतील. मंत्रिमंडळावर निदान राज्यमंत्री म्हणून किंवा फारतर विधानमंडळ पक्षाच्या एखाद्या पदावर तरी जागा मिळावी म्हणून त्यांचे प्रयत्न चालू होतील. ज्यांच्या फारशा महत्त्वकांक्षा नाहीत, असे आमदार आणखी एखाद्या कुठल्यातरी कमिटीवर वर्णी लावून घेण्याचा प्रयत्न करतील. काहींना लायसन्सेस हवी आहेत. काहींना स्वतःसाठी, काहींना दुसरयासाठी. कुणाचा मोटारींच्या प्रायॉरिटीमध्ये अद्याप नंबर लागलेला नाही, तो लावून घ्यायचा आहे. कुणाला मुंबईत फ्लॅट मिळवायचा आहे, मिळवून द्यायचा आहे, कुणाला जायकवाडीच्या क्षेत्राखालची जागा विकत घ्यायची आहे, कुणाला पेंचचं पाणी आपल्या शेताशेजारुन न्यायच आहे, तर कुणाला राष्ट्रीय हमरस्ता आपल्या मतदारसंघातून न्यायचा आहे. कुणाला साखर कारखान्याच्या पुढच्या निवडणूकीसाठी उभं रहायच आहे, तर कुणाला जिल्हापरिषदेच अध्यक्षपद हव आहे. कुणाला दारु दुकानाचा परवाना हवा आहे, तर कुणाला स्पिरीटची डिस्ट्रिब्युशन एजन्सी. अशा इतर अनेक गोष्टी. नेहमीच या चालू असतात. पण आता त्यांना जोर येईल कारण अशा रजकीय रणाधुमाळीच्या काळात प्रसादाचे वाटप मुकहस्तानं होत असत.अशा काळात नुसत्या आश्वासनांनादेखील महत्त्व असत आणि मटक्याच्या व्यवहारात सगळं काम जसं तोंडी बोलून चालतं आणि त्यावर विश्वास ठेवला जातो, तशीच अशा काळात तोंडी झालेली देवाण-घेवाण प्रामाणिकपणे पाळली जाते, असा सगळ्यांचा विश्वास असतो. नाही पाळली गेली, तर त्याचे परिणाम काय होतील, याची प्रत्येकाला कल्पना असते. तेव्हा ही सुवर्णसंधी आता कुणी सोडणार नाही. सर्व आमदार, खासदार, पक्षकार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री या लढतीत मोठ्या हौसेन भाग घेतील. सार्वत्रिक निवडणुकांना अजून दोन वर्ष अवधी आहे. त्याच्या आधी अशी पर्वणी क्वचितच येते. आली आहे तोवर हात धुऊन घ्यायचे.
हे वर्तुळ अद्याप वाढलेलं नाही. वर्तुळाच्या कक्षा जेव्हा वाढत जातील, तेव्हा इतर अनेक लोक त्यात ओढले जातील.विरोधी पक्षातील इच्छुक, आमदार, व्यापारी, कारखानदार, वेळ प्रसंग पडला तर सरकारी अधिकारी आणि पोलिसदेखील. जमिनदार तर आहेतच. बाजूला रहातील फक्त लोक. त्यांना या रणधुमाळीचा उपसर्ग पोचणार नाही असं नाही. पण त्याला जनतेचा इलाज नाही. कारण निवडणूकांना अद्याप दोन वर्ष अवधी आहे. तोवर लोकांना काहीच करता येणार नाही. पण हे वर्तुळ वाढणार नाही असही नाही. हळूहळू वाढेल. आता तर कुठे वलयं निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे.

1 comment:

Anil P said...

Nice review.

Indians writing in English have rarely touched upon Politics in their narratives. Good to see Marathi literature handling this.