Thursday, August 13, 2009

स्वामी

स्वामी कादंबरीमधले माझे काही आवडते परिच्छेद ....

" रमा ज्या मार्गाने तू जातेस, तो तू डोळे भरून बघ. वाटेने तुला सागराचं दर्शन होईल. किनारयाकड़े सारखा झेपावणारा तो सागर बघ. प्रत्येक ठिकाणचा सागर तुला वेगळा भासेल. प्रत्येक ठिकाणचा किनारा बारकाइने पाहिलास, तर वेगळा आवाज देईल. काही ठिकाणी सागराचा प्रमत्तपणा तुला दिसेल, काही ठिकाणी त्याच्या आवाजात व्यथा व्यक्त होईल. भरतीला पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी गर्जत येणारा सागर, जेव्हा ओहोटी सुरु होते तेव्हा व्याकुळ होउन मागं जाताना दिसेल. काठावरच्या नारळी-पोफळीच्या बागा सागराला हसताना दिसतील. तो पराजय मोठा विदारक आहे; क्लेशदायक आहे. हाताशी आलेल्या धरतीचा स्वीकार करता येऊ नये, हा त्या प्रियकर सागराचा पराभव अनुकंपेने बघ. नित्याचा तो पराभव तो सहन करतो आहे. तरीही प्रेमाची उत्कटता एवढीही कमी होत नाही."


" रमा पौर्णिमेच्या रात्रीनं बेभान होणाऱ्या फारच थोड्या माणसांना अमाव्स्येच्या रात्रीचं सौंदर्य पाहता येतं. ज्यांना ही दृष्टी लाभली, त्यांना सुखदुःखांचं भय उरत नाही. दोन्ही प्रसंगात देखील सौंदर्य टिपण्याची त्यांची तयारी झालेली असते.पहाटे सूर्यबिंब जेव्हा क्षितिजावर येतं, तेव्हा त्याच्या तेजानं आकाश झळाळत असतं. सूर्य जन्माचं ते प्रतीक असतं; पण सायंकाळी तोच सूर्य अस्ताला जात असता साऱ्या आकाशात रंगांची बरसात दिसून येते. सारा दिवस आपल्या तेजानं पृथ्वीला न्हाऊ-माखू घालून जीवन कृतार्थ झालेलं असतं. त्यांचं समाधान त्या रंगांनी प्रकटतं. असं समाधान किती जणांचं असेल ?”


" ख़बरदार ! राज्य नको बगावत हवी ! जबाबदारी नको, बेशिस्त हवी. तीन वेळा पेशवेपद पायी टाकलं, ते लाथाडलंत. नाही काका, आता मला ते सहन करण्याची ताकद नाही, सारया आयुष्यभर काकांचे लाड पुरे करण्याखेरीज मला दुसरं काही कामच नाही का ? “ तुमच्या जागी दुसरा कुणी असता, तर ...” काय केलं असतं ? मला विचारता काका ? कुठून आणलंत हे बळ काका ? काय केलं असतं, ऐका ! दुसरं कुणी असतं, तर हत्त्तीच्या पायी दिलं असतं ... मेखसून मस्तक छिनलं असतं ... तुमच्या जागी माझा मुलगा असता, तरी हेच केलं असतं ....”


"रमा मृत्यू अटळ आहे, जे जे दिसतं ते एक ना एक दिवस नाहीसं होणार, मग ते आज असो अथवा कैक वर्षानी होवो. जीवन व मृत्युचं भय बाळगणारयाला केव्हाही समृध्द जीवन जगता येणार नाही. रमा,जीवन किती वर्ष जगला, त्याला फारसा अर्थ नाही. जीवन कसा जगला, ह्याला महत्त्व आहे. नाही तर चंदनाचं नावही राहिलं नसतं. सारयानी वटवृक्षांचं कौतुक केलं असतं. जो आनंद चंदनाच्या माथी लिहिला आहे, तोच आनंद मी उपभोगतो आहे. खरचं रमा, मी समाधानी आहे. सुखी आहे. तृप्त आहे. दारी आलेल्या मृत्यूचं स्वागत करायला मी तयार आहे, त्यांचं भय मला वाटत नाही ...


2 comments:

Aparna said...

हे परिच्छेद म्हणजे नुसतेच दोन व्यक्तींमधील संवाद नसून, त्यामधे आयुष्याचं तत्त्वज्ञान मांडलेल आहे. खरतर, ओघाने येणारया प्रसंगानुरुप ते जास्त चांगले समजेल. त्यामुळे आता हे पुस्तक वाचावेच लागेल. (वाचायच्या पुस्तकांची यादी वाढत चाललीये. :) )

Poonam said...

hey thanks a lot manju for posting this ! :)
Its from one of my fav books :)